संतश्रेष्ठ श्री सावता महाराज ७३१ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव उत्साहात
लोणी :राहता येथील श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये वारकरी संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा संतश्रेष्ठ श्री सावता महाराज यांचा ७३१ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२६ ते बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे संपूर्ण नियोजन प.पू. स्वामी रामानंदगिरी महाराज (मुक्ताई ज्ञानपीठ, पुणतांबा) यांच्या आधिपत्याखाली करण्यात आले असून या महोत्सवामुळे संपूर्ण राहता परिसर भक्तिसागरात तल्लीन झाला आहे.
या आठवडाभर चालणाऱ्या अध्यात्मिक महोत्सवाची सुरुवात विविध धार्मिक कार्यक्रमांनी होत असून, दररोज सकाळी भाविकांसाठी शिस्तबद्ध व नियमबद्ध दैनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ७ ते १० या वेळेत पवित्र ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत हरिपाठ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे सुश्राव्य हरिकीर्तन पार पडत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील भाविकांना संतवाणीचे आणि ज्ञानेश्वरीच्या अमूल्य विचारांचे पैलू अनुभवता येत आहेत.
महोत्सवाच्या या पवित्र पर्वात रोज रात्री हरिकीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. मायराज महाराज अनर्थे (चंद्रपूर) यांच्या किर्तनाने सुरुवात होणार आहे त्यानंतर गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. मनोज महाराज माळवे (काकडी), शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. तुकाराम महाराज बनकर (राजुरी), शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. सुनील महाराज पवार( आश्वी), रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी प्रख्यात भागवताचार्य ज्योतीताई सोनवणे (वैजापूर), सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. छगन महाराज खडके (प्रति इंदोरीकर कळस) आणि मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प्र. काशिकानंदगिरीजी महाराज (निमगाव को.) यांच्या सुमधूर आणि प्रबोधनपर कीर्तनांनी येणारे भाविक मंत्रमुग्ध होणार आहेत.
महोत्सवाच्या उत्तरार्धात मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संतश्रेष्ठ श्री सावता महाराज यांच्या प्रतिमेची व ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या मिरवणुकीत शेकडो वारकरी व भाविक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभागी होणार आहेत.
या भव्य महोत्सवाची सांगता बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, त्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत प.पू. स्वामी रामानंदगिरी महाराज (मुक्ताई ज्ञानपीठ, पुणतांबा) यांचे काल्याचे कीर्तन होईल. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या संपूर्ण सोहळ्याची सांगता होणार आहे. या महोत्सवामध्ये ज्ञानेश्वरी व्यासपीठावर ह.भ.प्र. पंढरीनाथ महाराज लुटे (राहता) हे सेवा देत आहेत, तर गायनाचार्य म्हणून ह.भ.प्र. रामकृष्णा महाराज चौधरी (शिंगवेकर) आणि ह.भ.प्र. संदिप महाराज बागुळ (साकुरीकर) सहकार्य करत आहेत. तसेच मृदंगाचार्य, हरिपाठ नेतृत्व, काकडा भजन व कीर्तन साथ यासाठी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, गणेश भजनी मंडळ, मारुतीबाबा भजनी मंडळ, नवनाथ भजनी मंडळ, मालाई भजनी मंडळ, पैजनबाबा भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ, संतसेना भजनी मंडळ तसेच राहता परिसरातील समस्त गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी व समस्त भजनी मंडळ अहोरात्र आपली सेवा देत आहेत.
या संपूर्ण महोत्सवाचे आयोजन समस्त माळी पंच मंडळी, राहता (ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील सर्व भाविकांनी या अभूतपूर्व कीर्तन सप्ताह सोहळ्याचा व महोत्सवाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त माळी पंच मंडळी व श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, राहता यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment