आदिवासी व वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सूर्योदय परिवाराचे कार्य कौतुकास्पद : सरसंघचालक मोहन भागवत



 { सूर्योदय पारधी-आदिवासी आश्रम विद्यालयातील ऑडिटोरियम व अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण }

कोल्हार प्रतिनिधी :-
वंचित आणि आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण, संस्कार, क्रीडा व कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचे कार्य सूर्योदय परिवाराकडून सातत्याने सुरू आहे. या कार्यातून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले असून, हा उपक्रम समाज परिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांनी केले.
 बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री.सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टद्वारे संचालित सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ऑडिटोरियम तसेच तीन अत्याधुनिक क्रीडांगणांनी सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण श्री.मोहनराव भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी संघटन मंत्री आशुतोष तिवारी, देवासचे खासदार महेंद्र सिंह सोलंकी, भाजपा किसान मोर्चा मध्यप्रदेशचे प्रदेश मंत्री राजीव पटेल, अमनोरा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, संत-महात्मे, समाजसेवक, मान्यवर नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प.पू.भय्यूजी महाराज यांनी शिक्षण, संस्कार आणि सेवेला समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून वंचित व गरजू घटकांच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या दूरदृष्टीला पुढे नेत आश्रम विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक व क्रीडा सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
नव्याने उभारण्यात आलेले ऑडिटोरियम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. त्याचबरोबर तीन अत्याधुनिक क्रीडांगणांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हे लोकार्पण केवळ इमारती आणि क्रीडांगणांचे उद्घाटन नसून, प.पू भय्यूजी महाराजांनी पाहिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिक्षण, सेवा आणि संस्कारांच्या माध्यमातून वंचित व आदिवासी समाजातील नव्या पिढीला आत्मविश्वासी, स्वावलंबी आणि सक्षम बनविणे,शिक्षण प्रवाहात आणले असून सूर्योदय परिवाराचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे कौतुकही केले.
श्री.सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट तसेच अमनोरा फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणारे उपक्रम केवळ शिक्षण व क्रीडेपुरते मर्यादित नसून समाजातील गरजू घटकांसाठी आरोग्यसेवा, कौशल्य विकास, मोफत प्रशिक्षण, महिला स्वावलंबन, आश्रम, बालगृह, अन्नक्षेत्र आणि विविध सामाजिक सेवा प्रकल्पांच्या माध्यमातूनही कार्य सुरू आहे.
सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालयातील या नव्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल. हा नवा अध्याय ‘शिक्षणाची जागृती आणि प्रगतीचा संकल्प’ प्रत्यक्षात साकार करणारे प्रेरणादायी उदाहरण ठरेल, असे मत सूर्योदय परिवाराच्या संचालिका व राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच सूर्योदय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध