लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध
दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७--अजिंठा डोंगररांग ही सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेपासून नाशिक जवळून पूर्व पश्चिम या दिशेने वेगळी झालेली आहे. सह्याद्री इतकीच तोला मोलाची जैवविविधता ,वनसंपदा , अजिंठा लेणी सह ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तुशिल्पे या डोंगरा रांगेत विसावलेली आहे. दौलताबाद चा डोंगर ही याच रांगेचा भाग आहे. या डोंगर रांगेत पूर्वीपासून जंगलाचा राजा असणाऱ्या वाघाचे अस्तित्व आजही टिकून आहे.
गौताळा ते विदर्भातील टिपेश्वर व ज्ञानगंगा अभयारण्य यामधील दुवा म्हणून ही डोंगररांग परिचित आहे. विविध वन्य जीवांचा हा भ्रमण मार्ग म्हणजेच वाईल्ड लाईफ कॉरिडोर आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव ,जालना, नासिक ,बुलढाणा ,अकोला या सहा जिल्ह्यात विस्तार असलेला हा मोठा डोंगर या सहा जिल्ह्यांमध्ये पर्जन्य मानाचा मोठा आधार आहे .सुमारे ५० लहान मोठ्या नद्या या डोंगराच्या कुशीत उगम पाहून लक्षावधी एकर शेत, गायरान, सामाजिक वनक्षेत्र जमीन व लाखो वन्यजीव तसेच जनसमुदायास पाणी उपलब्ध करून देणारा शाश्वत वारसा आहे. याच वारसाकडे हैदराबाद व इतर राज्यातील जलविद्युत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची- उद्योगसमूहांची वक्रदृष्टी पडली आहे. हजारो जंगली भारतीय प्रजातीचे व जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे वृक्ष या कामी तोडली जाणार आहे. सोबतच डोंगर पोखरला जाणार असून पावसाचे प्रमाण प्रचंड कमी होऊन याचा फटका आधीच अवर्षण ग्रस्त असलेल्या छत्रपती संभाजीनगर ,जालना ,बुलढाणा ,जळगाव ,अकोला जिल्ह्यांना बसणार आहे. वन्यजीवन विस्थापित होऊन वन्यजीव हे गावाकडे व मानवी वस्तीकडे येऊन शेतीचे नुकसान होईल व मनुष्य वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होईल अशी माहिती अजिंठा वनरक्षण समितीचे अध्यक्ष व पर्यावरण संवर्धक सिल्लोड येथील डॉ. संतोष पाटील यांनी आज माध्यमांसोबत बोलताना दिली. नायगाव ते वडोद (विठ्ठलाचे) येथील ग्रीनको या हायड्रो थर्मल पावर प्रोजेक्ट या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १२३५ एकर जमीन संपादित होणार असून त्यापैकी ७५० एकर जमीन ही वनविभागाची असणार आहे. अंदाजे २०,००० कोटी रुपये गुंतवणुकीचे व चार हजार मेगा वॅट विजन निर्मिती उद्दिष्ट असलेले हे दोन प्रकल्प आहेत.स्टेज २ व स्टेज ३ मध्ये याचा विस्तार होईल व अजून वनक्षेत्र, शेत जमीन यात संपादित होऊ शकते.पाण्यापासून वीज निर्मितीचे या दोन्ही प्रकल्पांच्या' टर्म ऑफ रेफरन्स "ला नुकतीच केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पास २०२१ च्या डिसेंबरमध्ये तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला होता मात्र या कंपन्यांनी काय जादू केली की आत्ताच्या सोयगाव व कन्नडच्या वनक्षेत्र आधीकारी व छत्रपती संभाजी नगरच्या मुख्य वनसंरक्षक यांनी डोंगराचे लचके तोडण्यास अनुमती दर्शवली अशी संतप्त भूमिका वडोद ,वाडी,बनोटी ,घोसला येथील शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केली. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार वडोद विठ्ठलाचे या कन्नड तालुक्यातील व या डोंगराच्या काठावर असलेल्या गावकऱ्यांनी डॉ. संतोष पाटील यांच्यासोबत वडोद येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी जिथे हा प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पात उभे असलेल्या महादेव मंदिरामध्ये शमी म्हणजेच खेजडीचे वृक्ष रोपण करून लढाईचे रणशिंग फुंकले. -- खेजडीचे रोपण का केले--- १७३० मध्ये राजस्थानमध्ये खेजडी म्हणजेच शमीचे झाड वाचवण्यासाठी अमृता देवी बिश्नोई व संपूर्ण बिश्नोई समाजाने या झाडांना आलिंगन देऊन जगातील पहिले 'चिपको आंदोलन 'केले होते व त्या आंदोलनात ३६३ जणांनी इतिहासात अजरामर असलेले बलिदान दिले होते. त्या शमीच्या झाडाचे रोपण करून पुढील आंदोलनाचा लाक्षणिक इशारा समिती गावकरी व राज्यातील पर्यावरण प्रेमी जनतेने दिला आहे.
--------------वाळवंट करू नका---अत्यंत धक्कादायक बाब अशी की वडोदव विठ्ठलाचे येथील ग्रीन -को प्रकल्प व घाटनांद्रा ते केळगाव या दरम्यान प्रस्तावित असलेला मेगा पॉवर प्रोजेक्ट यामध्ये फक्त दहा किलोमीटर इतकेच अंतर आहे व या दोन्ही प्रकल्पाच्या मधून नुकताच मंजूर झालेला छत्रपती संभाजी नगर ते जळगाव हा समृद्धी महामार्ग जाणार आहे. भारतात इतक्या जवळ इतके मोठे दोन प्रकल्प कुठेही झालेले नाहीत. या सोबत समृद्धी ,रेल्वे व इतर तीन नवीन रस्ते या डोंगराला चिरून होऊ घातले आहेत. या सर्वांचा परिणाम पावसा वर होईल,वन्यजीव विस्थापन ,जैव विविधता नष्ट होणे , वनसंपदा व कृषी व्यवस्था धोक्यात येणे यावर होईल. मानव, सरकार व कोणत्याही संस्था यांनी कितीही प्रयत्न केले तरी आपण डोंगर ,पाऊस ,जंगल ,वन्यजीव ,शेतजमीन निर्माण करू शकणार नाही. जामनेर तालुक्यात निर्माण झालेल्या वाघूर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या खिशात करोडो रुपये आले. त्यांनी बंगले बांधले , महागड्या गाड्या खरेदी केल्या. या गोष्टीला फक्त १४ वर्ष झाली .आज हेच कालचे करोडपती लोक , महिला दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करत आहे. ही लढाई जल ,जंगल ,जमीन ,जीव ,जण वाचवण्यासाठी आहे यात राज्यातील निसर्गप्रेमी जनतेने निस्वार्थ सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment